महासभेत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराचा विकास खुंटल्याचा आरोप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | शहराच्या विकास कामांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध असतांना  मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये  समन्वय नसल्याने  हा निधी खर्चाची मुदत संपुष्टात येवून देखील कामांना सुरुवात करण्यात झालेली नाही. या विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी महासभेत केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तर भाजपचे कैलास सोनवणे यांनी सत्ताधाऱ्यांचे अधिकारी ऐकत नसतील तर महापौर – उपमहापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

 

आज शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनिल गोराणे आदी उपस्थित होते.

महासभेत सदस्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांतील समन्वया अभावी शहराचा विकास खुंटला असल्याच्या आरोप केला. यावेळी  नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, ॲड. दिलीप पोकळे, प्रशांत नाईक, सरिता नेरकर यांच्यासह इतर नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. अनंत जोशी यांनी निधी आणतांना येणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनवले.

नितीन बरडे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी दिला होता.  कार्यादेश दिले गेले परंतु,अमृत योजनेचे नळ कनेक्शन देण्याचे बाकी असल्यामुळे तेथील रस्त्यांची कामे करता येत नाही.  १६ महिने झाली तरी देखील कामांना अद्याप सुरुवात देखील झालेली नाही, जर आपल्याकडे निधी पडून आहे तरी देखील मनपाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कामे होत नसतील तर, अशा कर्मचाऱ्यांना दोषी धरुन त्यांच्यावर कारवाई करा, अशी भूमिका नितीन बरडे यांनी मांडली. याप्रसंगी  कैलास सोनवणे, चेतन सनकत, अनंत जोशी, ॲड. दिलीप पोकळे, प्रशांत नाईक  यांनी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

 

कैलास सोनवणे यांनी केली महापौर – उपमहापौरांच्या राजीनाम्याची मागणी 

सत्ताधारी नगरसेवक निधी असतांना अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाच्या तक्रार करत असल्याने भाजपचे जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तुमचे महापौर – उपमहापौर असताना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर, महापौर उपमहापौरांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली.  यावेळी  नितीन बरडे व बंटी जोशी हस्तक्षेप करून  सोनवणे यांना तुम्ही विषयांतर करु नका असे स्पष्ट केले. याचवेळी  उपमहापौरांनी देखील तुमच्या अडीच वर्षात तुम्ही कोणतेच कामे मार्गी लावू शकले नाही अशी आठवण देत आम्ही वर्षभरात अनेक कामे मार्गी लावल्याचे ठणकावून सांगितले.

Protected Content