डिजेमुळे रुग्णाने गमावली ऐकण्याची क्षमता : डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधी । लग्नसमारंभातील डिजेच्या प्रचंड आवाजामुळे एका तरुणाने आपली ऐकण्याची क्षमता गमावली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याच्या श्रवणशक्तीचे पुनरागमन झाले असून त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, भोकर येथील राजू जगन्नाथ कऱ्हाडे ( वय ३५ ) या रूग्णाला एका अपघातानंतर एका कानाने ऐकण्यास थोडेफार अडचणी येत होत्या. अपघातामुळे त्याच्या डाव्या कानावर परिणाम झाला होता. काही प्रमाणात आवाज ऐकू येत होता, मात्र त्याला विशेष त्रास नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होत असताना डिजेच्या अत्यंत मोठ्या आवाजाने त्याच्या डाव्या कानात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या व त्यानंतर तो कानाने पूर्णतः ऐकू येणे बंद झाले. रुग्णाची स्थिती पाहून त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे ईएनटी तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तपासणी करून सीटी स्कॅन व इतर आवश्यक तपासण्या केल्या.

तपासणीत त्याच्या मध्यकर्णातील हाडे आणि कानाच्या आतील रचनेवर गंभीर परिणाम झाल्याचे आढळून आले. डॉ. अनुश्री अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णावर ऑसीक्युलोप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली. ही एक सूक्ष्म पण अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून यात कानातील हाडांच्या पुनर्रचनेद्वारे ऐकण्याची क्षमता पुन्हा प्राप्त केली जाते. सर्जरीनंतर रुग्णाची परिस्थिती सुधारू लागली आणि ७ दिवसांच्या उपचारानंतर त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

याबाबत नाक, कान, घसा तज्ज्ञ तथा विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल म्हणाल्या की उच्च आवाजातील डिजे, विशेषतः बंद जागांमध्ये, कानासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. अपघातग्रस्त किंवा आधीच दुर्बल कान असलेल्या व्यक्तींनी अशा ठिकाणी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. मात्र वेळेवर उपचार झाल्यास श्रवणशक्ती परत मिळवता येते.

Protected Content