
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरात गेल्या वीस वर्षांपासून बस थांबा असला, तरीही आजपर्यंत येथे कायमस्वरूपी बस थांबा किंवा शेड उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे एरंडोल-पाळधीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी बस थांबा निर्माण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे शिवकॉलनीजवळ बसशेड उभारण्यात आले होते. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने हे शेड पाडून टाकले. तरीही महामंडळाच्या बसेस नेहमीप्रमाणेच येथे थांबत आहेत. परिणामी, बस पकडण्यासाठी शेकडो प्रवासी चौकात उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आणि अनेकदा अपघाताची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिकांच्या मते, बस थांबा नसल्यामुळे वाहतुकीत गोंधळ निर्माण होतो. सिग्नल चौकात बसेस थांबत असल्याने इतर वाहनांना मार्गक्रमण करणे कठीण होते. प्रवाशांना पावसात आणि उन्हात उभे राहावे लागते. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी बस थांबा आवश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.
नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, चौकापासून सुमारे २०० मीटर अंतरावर, हॉटेल चिनार गार्डन लॉनजवळ तसेच समोरच्या बाजूला आणि बाहेरगावी जाणाऱ्या बससाठी चौकापासून पुढे २०० मीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्के बसथांबे उभारावेत. यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होतील आणि प्रवाशांची दीर्घकालीन गैरसोय संपुष्टात येईल.



