यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील सरपंच पाटील यांच्या विरूद्ध १ विरुद्ध ९ अशा आवाजी मतदानाने आविश्वास प्रस्ताव पारीत झाल्याने त्यांना तीन वर्षाच्या गोंधळलेल्या कारभारानंतर अखेर पायउतार व्हावे लागले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार चुंचाळे तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या विद्यमान सरपंच सौ . सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध या ग्रामपंचायत सदस्यांनी मिळुन तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दिनांक ३१ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान आज दि.७ जुन रोजी दुपारी ४ वाजता तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांच्या उपस्थितीत अविश्वास ठराव संदर्भात चर्चा करून मतदान करण्यासाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती.
या सभेला सरपंच सुनंदा पाटील यांच्यासह उपसरपंच नजिमा अन्वर तडवी, ग्रामपंचायत सदस्य सुकलाल पाटील, जयनुर तडवी, सिंधु पाटील, अरमान तडवी, शारदा चौधरी, दगडु तडवी, अनिल कोळी, नौशाद तडवी असे एकूण १० सदस्य प्रामुख्याने या सभेला उपस्थित होते.
दरम्यान तत्कालीन सरपंच सुनंदा पाटील या मागील अडीच वर्षापुर्वी चुंचाळे ग्रामपंचायतीवर डिसेंबर २०१७या वर्षी लोकनियुक्त सरपंच म्हणुन निवडून आल्या होत्या. सरपंच झाल्या पासुन सुनंदा पाटील या कोणत्याही सदस्याला न घेता कामे करीत होत्या तसेच विविध सन्मानिय ग्रामपंचायत शारदा चौधरी, अनिल कोळी, अरमान तडवी, दगडु तडवी, सुकलाल पाटील सदस्यांनी वारंवार आपल्या प्रभागातील सुचना करून मागणी केलेल्या गावातील नागरीकांच्या समस्यांकडे विकासाच्या कामांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणे.
ग्राम पंचायतच्या कारभार सरपंच सुनंदा पाटील यांचे पती यांचा वाढता हस्तक्षेप या सर्व विषयावरून सरपंच यांच्या वागणुकीला घेवुन नाराज असलेल्या ९ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे सरपंच यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने आज चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावावर मतदान करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सरपंच सुंनदा पाटील यांच्याविरुद्ध १ विरूद्ध मतांनी अविश्वास ठराव मंजुर करण्यात आल्याने मागील तीन वर्षाच्या एकतर्फी होत असलेल्या कारभाराचा शेवट झाला.