पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक तथा चेस मॉडरेटर शंकर भामेरे यांच्यासह ४ विद्यार्थ्यांनी इको ट्रेनिंग सेंटर, स्वीडन, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक आणि बांग्लादेश एलीमेंटरी एज्यूकेशन इन्स्टीट्यूट यांच्या तर्फे आयोजित इंडिया-बांग्लादेश इंटरनॅशनल टेलीकोलॅबोरेशन प्रोजेक्ट २०२१ मध्ये सहभागी होऊन सदर प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला.
युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने २०१५ मध्ये जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी १७ ध्येये (SDG) निश्चित करून २०३०पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. या १७ ध्येयांपैकी भूक निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समानता, शुद्ध पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याची व्यवस्था, असमानता कमी करणे या ७ ध्येयांविषयी १६ सत्रांचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पद्धतींच्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या ध्येयांविषयी पहूर येथील शिक्षक शंकर भामेरे आणि पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडजी, ता. चोपडा येथील इंग्रजी विषय तज्ज्ञ जगदीश पाठक यांच्यासह रियाज तडवी, यश धनगर, आकांक्षा जाधव , अनिकेत जाधव ,कोमल पाटील , यश पवार या विद्यार्थ्यांनी बांग्लादेशच्या तंत्रस्नेही शिक्षीका खादीजा नसरीन यांच्याशी संवाद साधला . विद्यार्थ्यांनी बांगलादेशच्या शिक्षकांशी संवाद साधून येथील सण -उत्सव -शिक्षण प्रणाली या विषयी जाणून घेतले.
पहूर आणि वडजी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल कौतुक होत आहे. प्रकल्प राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेश सोनवणे, इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक प्रा.भरत शिरसाठ, बांग्लादेशचे प्रा. समसुद्दीन ताल्लुकदर, मेंटॉर टी.बी. पांढरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, गट शिक्षणाधिकारी विजय सरोदे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, केंद्र प्रमुख भानुदास तायडे, मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे, एच.बी. राऊत आदींनी अभिनंदन केले.