कापसाच्या मापात घोळ करणार्‍या तिघांविरोधात गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथे कापसाच्या मापात घोळ केल्या प्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, मोंढाळे प्र अ येथे विलास रमेश पाटील यांच्या मालकीचा कापूस लहू धडकू पाटील (रा.मोंढाळे प्र अ), संजय दशरथ वाणी (पारोळा) यांना ५२०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे दिला होता. हा कापूस मोजणीसाठी रावण त्र्यंबक पाटील (रा.दळवेल) याला मापाडी म्हणून ठेवले होते. गावातील दोन जणांचे कापूस मोजल्यानंतर विलास पाटील यांचा कापूस ट्रकमध्ये भरण्यात येत होता. एकावेळी चाळीस किलोच्या वजन यानुसार कापसाची मोजणी सुरू होती. २२ तोल झाल्यानंतर मापाडी रावण पाटील हा गुडघ्याच्या साह्याने तोल ढकलून प्रति तोल सरासरी दोन किलो म्हणजे क्विंटल मागे पाच किलो कापूस जास्त घेत असल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले.

यावरून शेतकरी संतप्त झाले. यातच याच व्यापार्‍याने काही जणांचा कापूस आधी खरेदी केला होता. ते देखील याबाबत व्यापार्‍याला जाब विचारल्याने गोंधळ वाढला. दरम्यान, या संदर्भात विलास पाटील यांच्या तक्रारीनुसार पारोळा पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content