जळगावात तोतया क्राईम ब्रॅन्चच्या अधिकाऱ्यांनी दोघांना लुटले

जळगाव प्रतिनिधी । क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी असल्याचे भासवून जळगावातील इच्छादेवी चौक आणि पिंप्राळा असे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांना आज सकाळी लुटल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसांनी एका संशयिताचे रेखाचित्र जारी केले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पुरूषोत्तम सोमानी (वय ५१) रा. भवानी मंदीर जवळ पिंप्राळा हे भवानी मंदीराजवळून जात असतांना दोन भामट्यांनी आम्ही क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून झडती घ्यावयाची असे सांगितले, यानंतर बनावट ओळखपत्र दाखविले. यादरम्यान सोमानी यांच्या झडती घेत असतांना भामट्यांनी गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची साखळी, ३ हजार रुपये रोख जबरी घेवून दुचाकीवरुन दोन्ही भामटे पसार झाले. दुसऱ्या घटनेत इच्छा देवी चौकात नजीक असलेल्या बेंद्रे हॉस्पिटलजवळ सुनील पितांबर चौधरी (वय ६०, रा. आयोध्यानगर) याच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची साखळी, ९ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम अंगठी असा ऐवज लुटून नेला. दरम्यान रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तत्काळ घटनास्थळासह परिसरात सीसीटीव्हीची पाहणी केली आहे. तसेच संशयित दोघांपैकी एकाचे रेखाचित्र जारी केले आहे. याप्रकरणी रामानंदनग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Protected Content