आदर्श नगरातून कापड व्यावसायिकाची कार लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या कापड व्यावसायिकाची घरासमोर पार्कींगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित प्रकाश कुकरेजा (वय-३०) रा. दत्तकृपा अपार्टमेंटच्या मागे, आदर्श नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कापड विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर त्यांनी त्यांची मालकीची स्वीप्ट डिझायर कार (एमएच १९ सीएफ ४२२५) पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची १ लाख २९ हजार रूपये किंमतीची कार चोरून नेली. त्यामुळे गाडीचे आर.सी.बुक, इन्सूरन्सचे कागदपत्र आणि कापडाचे नमुने देखील होते. संपूर्ण आदर्श नगर पिंजून काढला असता त्यांना कार कुठेही मिळून आली नाही.

अखेर सोमवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Protected Content