पोलिस कर्मचार्‍यासह पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात

पारोळा प्रतिनिधी । जामीनासाठी लाच स्वीकारतांना पोलीस कर्मचारी व तालुक्यातील मंगरूळ येथील पोलीस पाटलाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक करून अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. यातील संबंधीत व्यक्तीच्या आई-वडिलांना आरोपी न करण्यासाठी तसेच त्याच्या भावाला जामीन मिळावा म्हणून पोलीस कर्मचारी रवींद्र त्र्यंबक रावते यांनी दहा हजार रूपयांची लाच मागितली होती.

यानंतर संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीने एक पथक तयार करून सापळा रचला. लाचेची रक्कम तालुक्यातील मंगरूळ येथील प्रल्हाद पुंडलिक पाटील या पोलीस पाटलाच्या माध्यमातून स्वीकारण्याचे ठरले. मात्र एसीबीच्या पथकाने सापळा रचून या दोन्ही जणांना अटक केली आहे.

Protected Content