व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये : फाम व बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन

जळगाव प्रतिनिधी । जीएसटी कायदा व ई-वे पासमधील बदलांच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी बंदमध्ये स्थानिक व्यापार्‍यांनी सहभागी होऊ नये अशी भूमिका फाम व बाँबे गुडस असोसिएशनने जाहीर केली आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्र शासनाने जीएसटी कायदा आणि ई वे पास संदर्भात काही बदल केले असून त्याविरोधात आज देशभरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी व्यापारी वर्ग अडचणीत आला असून व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी न होता आपल्या व्यापारावर लक्ष केंद्रित करून आस्थापना सुरू ठेवाव्या असे आवाहन फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र फाम व बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

जीएसटी कायद्याच्या संदर्भात अनेक त्रुटी असून सरकारकडून त्या दूर करण्यासाठी व्यापार्‍यांशी सल्लामसलत करून चर्चा केली जात आहे. मफामम आणि बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे देखील यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. गेल्यावर्षी कोरोना असल्याने जवळपास सर्वच आस्थापना, कार्यालये बंद होते त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये व्यापार्‍यांनी सहभागी न होता आपले व्यवसाय सुरू ठेवावे, असे आवाहन फामचे अध्यक्ष विनेश मेहता, महासंचालक आशिष मेहता व उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी केले आहे.

Protected Content