पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विरोधी पक्षाच्या लोकांची कामे करून आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लाऊन त्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद हे कुणापासून लपून राहिलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांनाही दोन्ही नेत्यांनी याबाबत जाहीरपणे भाष्य केले होते. नंतर शिंदे सरकारमध्ये दोन्ही नेत्यांमधील वाद अजून कायम असल्याचे दिसून येत आहे. यातच अलीकडच्या काळात चिमणआबांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांना कामे दिल्याचे दिसून आले असून याच्या भूमीपुजनाला पालकमंत्र्यांचे पुत्र उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यावरच आमदार पाटील यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलतांना भाष्य केले आहे.
आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, विरोधकांना कामे देऊन त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे म्हणजे त्यांना पाठबळ देणे असून ही बाब अतिशय चुकीची अशीच आहे. सरकार आले म्हणून तुम्ही मंत्री बनलेले आहेत, याचे भान ठेवावे. मंत्रीपद ही कुणाची खासगी मालमत्ता नाही अशा शब्दांमध्ये आमदार पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.