‘या’ कारणामुळे पंकज धीर यांनी नाकारली होती अर्जुनाची भूमिका


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ‘महाभारत’ या लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या अभिनय प्रवासातला एक विलक्षण वळण घेणारा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. सुरुवातीला अर्जुनाच्या भूमिकेसाठी निवड झालेले पंकज धीर यांनी केवळ मिशीच्या कारणावरून ती भूमिका नाकारली होती. हा किस्सा त्यांनी स्वतः एका जुन्या मुलाखतीत उलगडला होता.

१९८८ साली बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका सुरु झाली आणि त्यात पंकज धीर यांनी साकारलेला कर्ण घराघरात पोहोचला. परंतु ही संधी आधी अर्जुनाच्या रूपात त्यांच्याकडे आली होती. ‘लेहरे रेट्रो’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत पंकज यांनी सांगितले होते की, “मी संवादलेखक राही मसूम रझा, भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजींसमोर अर्जुनाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. सर्वांना मी योग्य वाटलो, करारही झाला होता. परंतु नंतर बी. आर. चोप्रा यांनी मला सांगितलं की, अर्जुनाचं बृहन्नलाचं रूपही साकारावं लागेल, त्यासाठी मिशी काढावी लागेल.”

पंकज धीर यांनी मिशी काढण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. “मी त्यांना सांगितलं, सर, मी मिशी कापली तर छान दिसणार नाही. तेव्हा त्यांनी मला विचारलं, तू अभिनेता आहेस की कोण? केवळ मिशीसाठी एवढ्या मोठ्या भूमिकेचा त्याग करणं हास्यास्पद आहे,” असं पंकज यांनी सांगितलं. बी. आर. चोप्रा यांनी त्यांना थेट ऑफिसबाहेर काढलं आणि करार रद्द केला.

या नकाराचा पश्चाताप पंकज यांनी नंतर मान्य केला. “तो माझा मूर्खपणा होता,” असं स्पष्ट करत त्यांनी सांगितलं की सहा महिने काम न मिळाल्यानं ते फक्त डबिंग करत फिरत होते. मात्र नशिबाने त्यांना पुन्हा एक संधी दिली. चोप्रा यांनीच त्यांना पुन्हा संपर्क साधून कर्णाची भूमिका देण्याची ऑफर दिली. “त्यांनी विचारलं, कर्ण करशील का? मी लगेच विचारलं, सर मिशी काढावी लागेल का? त्यांनी नाही म्हणताच मी ही भूमिका स्वीकारली. ही भूमिका माझ्या नशिबातच होती,” असं ते म्हणाले.

या एका छोट्याशा निर्णयाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीत मोठा बदल घडवून आणला. अर्जुन नाही मिळाला, पण कर्णाच्या रूपात पंकज धीर यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.