गोव्यात शिवसेना व राष्ट्रवादीची आघाडी

पणजी वृत्तसंस्था | गोवा विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली असून आज मंत्री उदय सामंत यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून आज उदय सामंत यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीची माहिती दिली. ते म्हणाले की, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती झाली आहे. गोव्यातील नागरिकांना आता एक सक्षम पर्याय हवा आहे. तो आम्ही देणार आहोत. गोव्यातील जनतेला राजकारण समजत आहे. येथे नक्कीच परिवर्तन होणार आहे. तसा निर्धार गोवेकरांनी केला आहे. भाजपने पर्रिकरांचा अपमान केला आहे. ज्याने भाजपला मोठे केले त्यांना डावलण्याचे काम केले करण्यात आले आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गोवा विधानसभेसाठी नुकतीच शिवसेनेने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पणजी येथे शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना शिवसेना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढणार आहे. तर दुसरीकडे भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ४० पैकी ३४ जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.

Protected Content