जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील नेहरू चौक येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा आहे. मात्र, सध्या या पुतळ्याची अत्यंत दुर्दशा झाली असून त्याकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.
हा पुतळा शहराच्या प्रमुख भागात असून, त्याच्या समोरच रेल्वे स्टेशन तसेच टॉवर चौक आहे. त्यामुळे शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे या परिसरात नियमित येणे-जाणे असते. मात्र, या महापुरुषाच्या पुतळ्यावर जाड धुळ साचली असून, त्याच्या स्वच्छतेकडे कोणीही लक्ष देत नाही.
थोर नेत्यांच्या स्मृती जतन करणे हे केवळ औपचारिकता न राहता, त्यांचा योग्य सन्मान राखला पाहिजे. शहरातील नागरिक तसेच प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सार्वजनिक पुतळे आणि स्मारके ही शहराच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्यामुळे या पुतळ्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे आवश्यक आहे.
नेहरू चौक हा जळगाव शहराच्या मुख्य चौकांपैकी एक असून, येथे मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. अशा ठिकाणी असलेल्या थोर नेत्याच्या पुतळ्याची अशी अवस्था होणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. प्रशासनाने वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.