जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून संध्याकाळनंतर या भागात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुक्मिणी नगर ते वाघ नगर या दरम्यान नागरिक, व्यावसायिक आणि विशेषतः महिला व मुलींना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गिरणा पंपिंग रस्त्यावर श्री साई डेअरीजवळ सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत काही टवाळखोर तरुणांचा अड्डा तयार होतो. येथे मोठमोठ्याने गोंधळ, मस्ती आणि रस्त्यावर उभ्या दुचाकींच्या माध्यमातून वाहतुकीत अडथळा निर्माण केला जातो. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांचे कामकाज प्रभावित होत असून रहिवाशांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या टवाळखोरांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला व मुलींवर अश्लील टिप्पण्या, छेडछाड आणि शिवीगाळ केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अनेक महिला भीतीपोटी खाली मान घालून या परिसरातून जातात. परिसरात राहणाऱ्या कुटुंबांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली असून रात्री बाहेर पडणे टाळले जात आहे.
नागरिकांनी या संदर्भात रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा निवेदने देऊन तसेच फोनद्वारे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. टवाळखोर रस्त्यावर दुचाकी उभ्या करून मोबाईलवर गेम खेळणे, सिगारेट ओढणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ वर्तन करणे आणि अश्लील हावभाव करणे यांसारखे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी वाघ नगर स्टॉपजवळ दोन वेळा गोळीबार झाल्याच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिक आधीच भयभीत आहेत. त्यातच सध्याच्या टवाळखोरांच्या धिंगाण्यामुळे भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. श्री साई डेअरीजवळ अनेकदा वाद, भांडणे आणि मारामारीही होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले, मात्र तरीही पोलीस प्रशासनाकडून नियमित गस्त किंवा कडक कारवाई दिसून येत नाही.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी टवाळखोरांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासन आता या वाढत्या प्रकारांवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



