पंढरपुरात फुलला भक्तीचा मळा ! : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा

पंढरपूर | कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लक्षावधी भाविक दाखल झाले असून आज पहाटे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली.

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा आज पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. प्रारंभी चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली.

दरम्यान, यंदाच्या महापुजेचा मान यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पर्‍यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ औसेकर महाराज, नगराध्यक्षा साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content