शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे प्रतिनिधी | शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज पहाटे ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. ते १०० वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते १९४१ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६४ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. पुरंदरे यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Protected Content