पंढरपूर | आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक पुजा केली. याप्रसंगी त्यांनी आधीप्रमाणे भक्तांनी फुललेले पंढरपूर पहायचे असल्याची इच्छा व्यक्त करत हे विठ्ठला कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर असे विठूरायाला साकडे घातले.
आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची देखील उपस्थिती होती.
शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकर्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले. तर आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास ही ठाकरे यांनी व्यक्त केला.