पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील विद्यार्थ्यांनी भरवली जिल्हा परिषदेत शाळा

dhalgaon urdu shala

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील ढालगाव ता. जामनेर येथील जि.प.उर्दू शाळेत गेल्या पंधरा दिवसांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पंचायत समितीला वारंवार निवेदन देऊन देखील शिक्षक मिळत नसल्याने आज जळगाव जिल्हा परिषदेसमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवत आंदोलन केले व शिक्षणाधिकारी यांना मागणीचे निवदेन दिले.

याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून एकूण 185 विद्यार्थी आहेत. आठही वर्गांना शिकवण्यासाठी गेल्या वर्षी 4 शिक्षक होते. या चारही शिक्षकांवर उर्दू शाळेच्या शिक्षणाचा भार होता. दरम्यान या 4 शिक्षकांपैकी एकाची अगोदर बदली झाली. आता यावर्षी उर्वरित तीन शिक्षकांची देखील ऑनलाइन पद्धतीने बदली करण्यात आली. शिक्षकांची बदली होऊन 15 जून पासून शाळा सुरू झाल्या. दरम्यान गावातील शाळा समिती अध्यक्ष इतबार शब्‍बीर तडवी यांनी पंचायत समितीकडे उर्दू शाळेला शिक्षक मिळावा अशी मागणी केली होती. मात्र शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरीदेखील शाळेला शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होत आहे. अखेर आज जळगावातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शिक्षक मिळावा अशी मागणी केली.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसोबत शिक्षणाधिकारी यांच्याशी भेट घेतली व शिक्षक मिळावा याबाबत चर्चा करण्यात आले. यावर शिक्षणाधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात तीन शिक्षक नेमून देत असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष इतबार तडवी, सदस्य खैरुद्दिन तडवी, सलीम तडवी, खलील तडवी, सलीम तडवी, मन्‍सुर तडवी, मोसीन तडवी, राजबी नजीर तडवी, फर्जना खलील तडवी, माहेराज तडवी यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content