नवी दिल्ली-वृत्तसेवा | पाकिस्तानने काल रात्री अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्यांनी केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडत त्यांना हवेतच नष्ट केले आहे. तर भारताने जोरदार प्रत्युत्तर देतांना पाकचे चार हवाई तळ तसेच ड्रोन तळ उद्ध्वस्त केले आहेत.
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव कमालीचा वाढलेला असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमावर्ती भागांतील तब्बल २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सुमारे २५ स्फोट झाले, यात एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. मात्र, भारतीय सैन्यदलांनी बहुसंख्य हल्ले आपल्या अत्याधुनिक वायू संरक्षण प्रणालीने अपयशी ठरवले.
दुसरीकडे, जम्मूजवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर आणि आतंकवादी लॉन्चपॅड्सवर जोरदार हल्ले चढवले. या ठिकाणांहूनच भारतात ड्रोनद्वारे घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील किमान चार हवाई तळांवर भारतीय हल्ले झाले आहेत. यात ते उद्ध्वस्त झाले आहेत. श्रीनगर व आसपासच्या भागांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचेही समजते. भारतीय सेनेने या भागात जमीन ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने शनिवारी सकाळी इस्लामाबादमध्ये घेतलेल्या घाईघाईच्या पत्रकार परिषदेत दावा केला की, भारताने त्यांच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोरकोट) या तिन्ही एअरबेसवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. काही वेळातच भारतातूनही सूत्रांच्या हवाल्याने प्रत्युत्तर कारवाईची पुष्टी झाली.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधून कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री भारताच्या विविध भागांवर ड्रोन हल्ले केले.
रक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी गुरुवारी रात्री जम्मूच्या सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानी बाजूने डागलेल्या आठ क्षेपणास्त्रांना अडवले. यामध्ये जम्मू विमानतळासारख्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश होता.
सध्या नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू असून, भारतीय लष्कर जोरदार प्रत्युत्तर देत आहे.