ब्रेकींग : जागेचा वाद; चंद्रकांत हरी बढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एका मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष असलेले चंद्रकांत हरी बढे यांनी केवळ जागेच्या मालकी हक्काच्या बळावर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनीअरिंग’ याकॉलेजची जेसीबीच्या मदतीने तोडफोड केली तर संचालकासह इतरांनाना मारहाण करून जातीय शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत हरी बढे यांच्यासह एकावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑर्डरन्स फॅक्टरी वरणगाव येथे फायरमन म्हणून कार्यरत असलेले दीपक बळीराम वानखेडे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की,  त्यांनी सन-२०१८ मध्ये वरणगावातील बोदवड रोडवरील एका मंदिर ट्रस्टच्या जागेत पत्नीच्या नावे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग’ या नावाने एक कॉलेज सुरू केले होते. या जागेच्या भाडेकराराबाबत आणि बांधकामाच्या परवानगीबाबत त्यांची मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे यांच्यासोबत केवळ तोंडी बोलणी झाली होती. वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत बढे यांनी त्यांना २० वर्षांचा भाडेकरार करून देण्याचे आणि कॉलेजच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या त्यांच्या संस्थेमार्फत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बांधकामाचा संपूर्ण खर्च दीपक वानखेडे यांना करायचा होता आणि जागेचे दरमहा २५,००० रुपये भाडे ते चंद्रकांत बढे यांना देणार होते. दोघांमध्ये झालेल्या तोंडी करारानुसार, भविष्यात जेव्हा दीपक वानखेडे त्यांचे कॉलेज दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतील, तेव्हा त्यांनी बांधकामासाठी गुंतवलेले अंदाजे ९० लाख रुपये, त्यातून आजपर्यंतचे भाडे वजा करून उर्वरित रक्कम चंद्रकांत बढे त्यांना परत करणार होते. या तोंडी करारावर विश्वास ठेवून दीपक वानखेडे यांनी चंद्रकांत बढे यांना १० लाख रुपये आगाऊ रक्कमही दिली होती.
अध्यक्ष चंद्रकांत बढे यांच्या आश्वासनानंतर दीपक वानखेडे यांनी कॉलेजच्या बांधकामाला सुरुवात केली. सुमारे आठ महिने बांधकाम चालले, परंतु चंद्रकांत बढे यांनी त्यांना बांधकामासंबंधी कोणतीही अधिकृत परवानगी मिळवून दिली नाही. तरीही, जून २०१९ मध्ये कॉलेज सुरू झाले आणि विशेष म्हणजे त्याचे उद्घाटन चंद्रकांत बढे यांच्या हस्तेच झाले. त्यानंतर दीपक वानखेडे यांनी अनेक वेळा चंद्रकांत बढे यांच्याकडे भाडेकरार आणि बांधकामाच्या परवानगीबाबत विचारणा केली, परंतु त्यांनी नेहमीच टाळाटाळ आणि दुर्लक्ष केले. सन २०२१ मध्ये चंद्रकांत बढे यांनी जागेच्या भाड्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि वारंवार पैशांसाठी तगादा लावला. दीपक वानखेडे यांनी त्यांच्यातील तोंडी करारानुसार बांधकामाच्या रकमेतून भाड्याची रक्कम समायोजित करण्याचे बोलले, तेव्हा चंद्रकांत बढे यांनी ट्रस्टला पैशांची गरज असल्याचे कारण देत त्यांच्याकडून भाड्यापोटी १ लाख ७५ हजार रुपये घेतले. यानंतरही त्यांची पैशांची मागणी सुरूच राहिल्याने दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि चंद्रकांत बढे यांनी आजपर्यंत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा लेखी करार करून दिला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर, २८ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत हरी बढे आणि गोविंदा माळी जेसीबी मशीन घेऊन थेट दीपक वानखेडे यांच्या कॉलेजमध्ये घुसले आणि त्यांनी कॉलेजचे कंपाऊंड, मुख्य प्रवेशद्वार, संडास आणि इतर बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. कॉलेजमधील एका महिला कर्मचाऱ्याने तातडीने दीपक वानखेडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दीपक वानखेडे आणि त्यांचे कामगार जीतेंद्र माळी त्वरित कॉलेजमध्ये पोहोचले आणि त्यांनी चंद्रकांत बढे आणि गोविंदा माळी यांना तोडफोड थांबवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि संतप्त झालेल्या चंद्रकांत बढे यांनी दीपक वानखेडे यांना धक्का मारून खाली पाडले व मारहाण केली, ज्यामुळे त्यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली. मारहाणानंतर चंद्रकांत बढे यांनी दीपक वानखेडे यांना धमकी दिली की, त्यांनी ही जागा त्वरित खाली करावी, अन्यथा ते कॉलेज पूर्णपणे तोडून टाकतील आणि त्यांचे हातपायही तोडतील. इतकेच नव्हे तर, त्यांनी दीपक वानखेडे यांच्या जातीचा उल्लेख करत अत्यंत अपमानास्पद आणि जातीयवादी शिवीगाळ केली. या घटनेच्या वेळी समारंभासाठी जमलेल्या काही लोकांनी हा प्रकार पाहिला आणि जातीय शिवीगाळ ऐकली, ज्यामध्ये जीतेंद्र गणेश माळी आणि एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश होता. चंद्रकांत बढे यांनी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीमुळे दीपक वानखेडे यांनी तत्काळ तक्रार दाखल केली नव्हती, परंतु आज जितेंद्र माळी यांनी हिंमत दिल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरणगाव पोलीस ठाण्यात चंद्रकांत हरी बढे आणि गोविंदा माळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content