पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर केली दगडफेक

landan kach

लंडन, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचा पाकिस्तान विविध स्थरांवर सातत्याने विरोध करत आहे. काल (दि.३) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीला लक्ष्य केले. मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर अंडी फेकली, तसेच दगडफेकही केली. परिणामी खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

 

भारतीय उच्चायुक्तालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली असून, फोटो शेअर केले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबतची तक्रार केली असून निदर्शनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला ‘काश्मीर फ्रीडम मार्च’ नाव दिले होते. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. याचे नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी कलम ३७० हटवण्याविरोधात नारेबाजी करत दगडफेक केली. निदर्शनकर्त्यांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीरचे(पीओके) झेंडे होते. एका वृत्तानुसार सुमारे १० हजार पाकिस्तानी समर्थकांनी दगडफेक केली. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शने केली होती.

Protected Content