पॅजो रिक्षाचा अपघात: पाच जण गंभीर जखमी

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ वळण घेत असताना भरधाव पॅजो रिक्षा पलटी होऊन त्यातील ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. सर्व जण वरणगाव येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जात होते. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या लोहार परिवारातील पाच जण हे पॅजो रिक्षाने शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे निघाले होते. नशिराबादहून पुढे गेल्यावर उड्डाणपुलाजवळ वळण घेत असताना पॅजो रिक्षा अचानक उलटली. त्यातील सर्व पाच जणांना दुखापत झाली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर औषधोपचार केले आहे. त्यांना दाखल करून घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

या अपघातात शोभा मनोज जाधव (वय ४०), विमल देविदास लोहार (वय ७०), जितेंद्र देविदास लोहार (वय ४२), आशिष दिलीप लोहार (वय २०), स्वाती देविदास लोहार (वय ३७) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती जाणून घेतली. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Protected Content