मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या कन्येचे वाजत-गाजत स्वागत !

पहूर , ता . जामनेर- रविंद्र लाठे| अगदी मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या आपल्या कन्येचे येथे अतिशय जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

पहूर पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते कडूबा ठमाजी पाटील यांची नात तथा ग्रामपंचायत सदस्या मीनाताई शरद पाटील यांची २२ वर्षीय विवाहित मुलगी तथा पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश थोरात यांची पत्नी अश्विनी योगेश पाटील ( रा .पिंपळगांव बुद्रूक ) यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. गर्भवती असताना डबल न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना वाचविण्याची शर्तीचे प्रयत्न झालेत . वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता त्यांच्या गर्भात ७ महिन्यांचे २ भ्रृण मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली . परंतु दैव बलवत्तर म्हणून की काय ? डॉ शरद देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले . दवा आणि दुवा कामी आली .अडीच ते तीन महिने मृत्यूशी झुंज देत त्या या व्याधीतून मुक्त झाल्या.

दरम्यान, अगदी मृत्यूच्या दाढेतून बरे होऊन आज त्यांचे माहेरी पहुर पेठ नगरीत आगमन झाले . मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या लेकीचे स्वागत करण्यासाठी गावकरी ढोल ताशांचा गजर करत आतुरतेने वाट पाहत होते. वाजंत्रीच्या गजरात त्यांची गावातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर. .बी .पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content