योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार जळगाव उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून योगेश विठ्ठल पाटील यांना जाहीर झाला आहे.

शिवपुत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून पुरस्कारासंदर्भात कळविले आहे. रविवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजता नगर येथील माऊली सभागृहात या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

अव्वल कारकून योगेश पाटील हे प्रारंभी महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांना महसूल सहाय्यक पदावर असताना दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मंडळ अधिकारी बोदवड पदावर कार्यरत असताना सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरावरील पुरस्कार व सन २०१५-१६ मध्ये महाराजस्व अभियानामधील उल्लेखनीय कामकाजामुळे ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठीसुद्धा शिफारस करण्यात आली.

तसेच अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना तत्कालीन महसूल मंत्री मा. चंद्रकांतजी पाटील यांच्या हस्ते आपणास सन २०१६-१७ चा ‘उत्कृष्ट अव्वल कारकून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याच्या ७/१२ संगणकीकरणातील व जुन्या अभिलेख स्कॅनिंगच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याने त्यांना सन २०१७-१८ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली.

कोरोना संक्रमणातील काळात अडकलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी ई-प्रवास पासची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याने त्या कार्याची पावती म्हणून ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव यांनीही सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सन २०२०-२१ मध्ये सदर पुरस्कार गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक व तत्कालीन अपर जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रदान करण्यात आला होता.

Protected Content