Home Cities अमळनेर कळमसरेत रक्तदान शिबिरात १०० हून अधिक दात्यांचा सहभाग ; प्रत्येकाला प्रोत्साहनपर ट्रॉली...

कळमसरेत रक्तदान शिबिरात १०० हून अधिक दात्यांचा सहभाग ; प्रत्येकाला प्रोत्साहनपर ट्रॉली बॅग भेट

0
10


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथे रामरहीम गणेश मित्र मंडळ आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान… जीवनदान… थेंब तुमचा, जीवन त्यांचे’ आणि ‘रक्तदान ही सर्वोत्तम सेवा, मानवतेचा खरा उत्सव’ या संदेशांनी प्रेरित झालेल्या या उपक्रमाला नागरिक, गणेशभक्त तसेच मारवड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबिरात १०० हून अधिक गणेशभक्तांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांमध्ये विविध क्षेत्रातील नागरिकांसह मारवड पोलीस स्टेशनच्या अधिकारी वर्गाचाही सहभाग होता. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात आली. ‘रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती, मोठा फरक!’ या उद्देशाने रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यात आले. सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि नवजीवनाचा संदेशही यावेळी देण्यात आला. रामरहीम गणेश मित्र मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून, गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या माध्यमातून सलग दहा ते बारा दिवस विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या मंडळाच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘रामरहीम गणेश मित्र मंडळा’ची स्थापना करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देत रक्तदानासारख्या सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने मंडळाने समाजासमोर एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. रक्तदान शिबिरावेळी साजिद मसनुरी, विनोद पवार, पिंटू राजपूत, डॉ. कपिल महाजन, मेडिकल प्रतिनिधी दीपक पाटील, प्रतीक महाजन, पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष नईम पठाण, उपाध्यक्ष मोतीलाल महाजन, महेंदमुखा पठाण, भागवत कोळी, दिलीप चौधरी, हिरालाल महाजन, दत्तात्रय चौधरी, जयदीप राजपूत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound