पळसगडावर आढळला चौथा दरवाजा : सहयाद्री प्रतिष्ठानची कामगिरी (व्हीडीओ)

chalisgaon 1

चाळीसगाव (प्रतिनिधी) सहयाद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत असते. प्रतिष्ठानचा शहापुर विभाग गेल्या चार वर्षांपासून माहुली किल्ल्यावर दुर्गसंवर्धन करत आहे. गडावरील महादरवाजाच्या पायऱ्यांची स्वछता, भांडरदुर्ग येथे संवर्धनाचे काम नियमितपणे सुरू असते. तसेच गडावर स्थळ दर्शक, दिशा दर्शक सूचना फलकही लावण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात आले आहे. या संस्थेच्या सदस्यांना नुकताच पळसगडावर भग्नावस्थेतला चौथा दरवाजा आढळून आला आहे.

 

एकाच डोंगरावर घळीमुळे जे तीन भाग वेगळे झाले आहेत, त्यावर माहुली किल्ला, भंडारदुर्ग आणि पळसगड असे दुर्ग त्रिकुट सध्या अस्तित्वात आहेत. दि.२० एप्रिल रोजी सहयाद्री प्रतिष्ठान शहापुर विभाग सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ गुरुनाथ आगीवाले यांच्यासोबत गडावरील दुर्ग अवशेष शोधण्याची मोहीम घेण्यात आली. तिन्ही किल्याचा इतिहास त्याचे स्थापत्य दृष्टीने अवशेष शोधण्यासाठी गणेश रघुवीर आणि त्यांची टीम गडावरील जंगलात निघाली. यामध्ये त्यांना गडाच्या २ ते ३ घळी उतरून चढावे लागले तर काटेरी झाडी झुडपातुन जावे लागले. शहापुर विभागाचे संपर्क प्रमुख गौरव राजे आणि गुरुनाथ आगिवाले यांनी गेल्या आठवड्यात पळसगड पाहणीत खाली दरवाजाचे अवशेष आहेत असे सांगितले होते. गडावरील इतर झाडीत असलेले दुर्ग अवशेष शोधण्यासाठी आणि दरवाजाचे अवशेष पाहणीसाठीही शोध मोहीम आखण्यात आली होती. या शोध मोहिमेत गौरव राजे, गुरुनाथ आगिवाले, सुयोग जगे आणि गणेश रघुवीर यांनी सहभाग घेतला होता. या चार दुर्गसेवकांच्या टीमने पळसगडावरील खोरमार्गे येणाऱ्या घळीतुन वर चढाई केली, तेव्हा घळीच्या दोन्ही बाजूच्या कातळात तटबंदी आणि अर्ध वर्तुळाकार दगडी तुटलेली कमान होती या कमानीच्या वर डाव्या बाजूला ३० फूट उंच नृत्य प्रकारात गणपती मूर्ती शिल्प कोरलेले त्यांना दिसले. तर कमानीच्या वरच्या बाजूला म्हणजेच पळसगडाच्या दिशेला मातीने बुजलेल्या आठ पायऱ्या आढळल्या. आजपर्यंत किल्ल्यावर झालेल्या लिखाणात गडावर महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा या तीन दरवाजांच्या नोंदी आहेत. पर्यटक आणि गिर्यारोहक या तिन्ही दरवाजाजवळ पाहणीसाठी जात असतात. परंतु हा दरवाजा कित्येक वर्षे दुर्लक्षित असून याची नोंद आढळत नाही. गडाचा चौथा दरवाजा गणेश दरवाजा किंवा गणपती दरवाजा म्हणून असावा कारण या दरवाजावर गणेशाचे मूर्ती शिल्प आहे. खोर गावातून येणाऱ्या वाटेवर गडाच्या महादरवाजा प्रमाणेच या दरवाजावर लहान दगडी तुटलेली कमान आहे. अर्धी कमान मातीत आणि दगडात गाडली गेली आहे. संस्थेच्या सदस्यांनी कमानी खालचे दगड काढल्याने सध्या कमानीची अर्थात दरवाजाची उंची ही ४.५ फूट एवढी झाली आहे . आणखी खाली गाळ माती काढली तर आणखी ५ फूट खोल एवढा दरवाजाचा खालचा भाग मोकळा होईल. असे संस्थेचे दुर्ग संवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले आहे.

 

 

गडाच्या इतिहास डोकावले आपल्याला इ.स.१६८४ निजामशाही कालखंड पासून झाकलेले बांधकाम त्यानंतर मोघल सरदार मनोहरदास गौड यांनी तिन्ही गडाच्या केलेली बांधणी आणि मोठ्या प्रमाणात केलेली डागडुजी तसेच मराठ्यांच्या काळात गडावर झालेले बांधकाम, असे गडावर या तिन्ही राजवटीच्या काळात केलेले स्थापत्य बदल दिसून येतात. महादरवाजा हा मुख्य असून याची कमान तुटलेली आहे, कमानीवर शरभ शिल्प होते. गडाचा दुसरा दरवाजा भंडार दुर्गवर आहे. हा दरवाजा खडकात कोरीव पायऱ्याने तयार करण्यात आला आहे. येथील शिलालेख काही वर्षांपूर्वी चोरीला गेला आहे तर माहुली किल्यावर असलेल्या हनुमान दरवाजा हा ढासळला असून इथे हनुमंतांची आणि गणपती मूर्ती शिल्पे आहेत तर कोरलेले लहान शिवलिंगही आहेत. पळसगडवरील नव्याने सापडलेल्या दरवाज्यावर गणपतीचे शिल्प आहे. प्रतिष्ठानतर्फे या गडावर सतत शोध मोहिमा सुरूच असतात. संस्थेचे दुर्ग अभ्यासक व दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर, शहापुर विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध थोरात, गौरव राजे, गुरुनाथ आगीवले, सुयोग जगे आणि गणेश रघुवीर आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

 

Add Comment

Protected Content