जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत देण्याची मागणी

jilhadhikari nivedan

रावेर, प्रतिनिधी | जिल्ह्यात अती पावसामुळे शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषानुसार सरकारी मदत त्वरित मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्व पिक परीस्थिती उत्तम होती. पण परतीच्या पावसामुळे उडीद, मुग, चवळी ही पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली, नंतर थोडा पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला. त्यात ज्वारी, कापूस, मका व सोयाबीन कापणीच्या तयारीत असतानाच पुन्हा परतीचा संततधार पाऊस सुरू झाला आणि तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यंदाचा पुर्ण हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती बोंडअळी, लाल्या, करपा, दुष्काळ, गारपिट, अतिवृष्टी या अनेक कारणांमुळे आज शेतकरी थकलेल्या अवस्थेत आहे. शेतकरी कर्जाचा डोंगराखाली दबलेला आहे, त्यामुळे शेतकरी सरकारकडे मोठ्या आपेक्षा बाळगून आहे. त्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा व पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी. तसेच दुष्काळाचे निकष लावून भरीव मदतीची घोषणा करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, लाईट बिलही माफ करावे, कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, नविन रब्बीचा हंगाम उभा करण्यासाठी रोखीची मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Protected Content