श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाच्या विकासासाठी 1,350 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.
करोनाची साथ आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे लागू कराव्या लागलेल्या शटडाऊनमुळे नुकसान झालेल्या जम्मू-काश्मीरमधील पर्यटन आणि इतर उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज देण्यात आले आहे.
या पॅकेजमध्ये सरकारने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरासाठी इलेक्ट्रीसिटी आणि पाण्याच्या बिलामध्ये 50 टक्के सवलत देऊ केली आहे. शेतकरी, कुटुंबे आणि उद्योगांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ही सवलत दिली गेली आहे.
उद्योगांसाठी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पॅकेज देण्याविषयी सरकार सक्रियपणे विचार करत आहे. हे पॅकेज जम्मू काश्मीरमधील उद्योगांना मोठे प्रोत्साहन ठरणार आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या केंद्रीय प्रशासनाकडून 950 कोटी रुपयांची थेट मदत केली जाईल. सर्व कर्जदारांना पुढील वर्षी मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कदेखील माफ केले जाणार आहे. हे आर्थिक पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत दिले गेल्याचेही सिन्हा यांनी जाहीर केले.