पॅक शेतमालावरही जीएसटी : धान्यांचे भाव कडाडण्याची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जीएसटी काऊन्सीलने पॅक केलेल्या शेतमालांवर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला असून यामुळे धान्यांचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. याचा फटका ग्राहकांना पडणार असून याला व्यापार्‍यांनीही विरोध सुरू केला आहे.

जास्तीत जास्त उत्पादने जीएसटीच्या अंतर्गत यावेत अशा हालचाली जीएसटी काऊन्सीलच्या माध्यमातून सुरू आहेत. या अनुषंगाने आता पोते, लहान पोतडे अथवा बॅग्जमध्ये पॅक केलेल्या धान्यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, यामुळे पॅकबंद शेतमालाचे मूल्य हे ५ टक्क्यांनी वाढणार आहे. हा सरळ ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. तर व्यापार्‍यांनाही जीएसटीच्या किचकट व्यवहाराचा हिशोब ठेवावा लागणार असल्याने त्यांनी देखील याला विरोध सुरू केला आहे. या निर्णयामुळे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी आदी पदार्थ महाग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातूनही याला विरोध होऊ लागला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जीएसटी लावण्याच्या या निर्णयाचा निषेध केला असून हा प्रकार अतिशय जाचक असून जनता आणि व्यापारी या दोन्हींचे नुकसान करणार असल्याचा आरोप केला आहे. यावर पुढील उपाययोजनांसाठी संघटनेतर्फे ८ जुलै रोजी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

Protected Content