जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे निलंबन करा – आ. किशोर पाटील

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हाड खुर्द येथील संस्थेला ठेका देतांना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिशाभूल केली असल्याचा आरोप करत आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुका कुर्‍हाड खुर्द येथील दक्ष हमाल मापाडी संस्थेला ठेका देताना गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या संस्थेला पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यांचा ठेका देण्यात आला होता. त्यात नियमांची पायमल्ली झाली. या कंत्राटासाठी चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील संस्थांनी निविदा भरली होती. त्या सारख्याच निघाल्याने दक्ष हमाल मापाडी संस्थेने चाळीसगाव व भडगावच्या संस्थेची नाहरकत दर्शवणारे बनावट स्वाक्षर्‍यांचे प्रतिज्ञापत्र तयार केले. यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने अवघ्या अडीच महिन्यांपूर्वीच नोंदणी झालेल्या या संस्थेला कंत्राट दिले. त्यांनी ९५ लाखांची उलाढाल देखील केली. लक्षणीय बाब म्हणजे सप्टेंबर २०१८मध्ये नोंदणी झालेल्या या संस्थेने चक्क २०१७-१८मधील आर्थिक उलाढालीचा सीएकडील दाखला व पाचोरा बाजार समितीचे एक वर्ष अनुभव प्रमाणपत्र देखील सादर केल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, दक्ष हमाल मापाडी संस्थेचे अध्यक्ष जगदीश काशीनाथ तेली यांच्याविरूद्ध जनार्दन हमाल मापाडी संस्थेचे अध्यक्ष मानसिंग राजपूत यांनी ९ जुलै २०२० पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती. तेव्हापासून तेली हे फरार झाले आहेत. त्यांच्या जामीनावर खंडपीठात २२ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी आता आमदार किशोर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तात्कालिन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ अध्यक्षांची दिशाभूल केली. त्यांची या संस्थेत भागीदारी आहे, असा आरोप करत सात दिवसांत त्यांचे निलंबन न झाल्यास येत्या अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Protected Content