पाचोरा नगरपालिकेत २१० कोटींचा भूखंड घोटाळा : ईडीकडे तक्रार दाखल करणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह स्पेशल रिपोर्ट | पाचोरा नगरपालिकेत विविध लोकल्याणकारी बाबींसाठी राखीव असणार्‍या भुखंडांचे आरक्षण हटवून तेथे व्यावसायिक संकुले उभारण्याच्या हालचाली सुरू असून यातून २१० कोटींची उलाढाल होणार असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याबाबत आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबई येथील शिवालय कार्यालयात काल पत्रकार परिषद घेऊन पाचोरा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केला. याप्रसंगी जळगाव शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत हे देखील उपस्थिती होती. Live Trends News याप्रसंगी सुषमाताई म्हणाल्या की, पाचोरा नगरपालिकेच्या हद्दीत मोठा जमीन घोटाळा करण्यात आलेला असून याचे कागदोपत्री पुरावे समोर आले आहेत. गेल्या कालखंडात कोविडमुळे नगरपालिकेच्या अनेक सभा ऑनलाईन या प्रकारात झाल्या. याच सभांमध्ये शहरातील आठ अतिशय मोक्याच्या ठिकाणावर असणार्‍या आरक्षीत भुखंडांचे आरक्षण उठविण्यात आले. यात शाळा, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, उद्याने आदींसाठी रिझर्व्हेशन असणार्‍या भुखंडांचा समावेश होता.

या सर्व जागा लोकल्याणकारी आणि लोकांच्या हितासाठी असणार्‍या सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. याच जागा नगरपालिकेच्या ऑनलाईन सभांमध्ये कोणतीही चर्चा न करता यावरील आरक्षण उठविण्याचे ठराव संमत करण्यात आले. यानंतर नगरविकास खात्याच्या माध्यमातून मंत्रालयातून पुढील कार्यवाही करून आता याच ठिकाणी विविध व्यावसायिक प्रकल्प उभे करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

याप्रसंगी सुषमाताई अंधारे म्हणाल्या की, नगरपालिका हद्दीतील राखीव जागा या अनारक्षीत करता येतात. मात्र यासाठी नियमावली आहे. यात राखीव जागांचे रिझर्व्हेशन उठविण्यासाठी आधी या जागेसाठी पर्याय द्यावा लागतो. तसेच जे आरक्षण २० वर्षांसाठी असते त्याला उठविता येत नाही. तसेच आरक्षण रद्द करतांना लोकांकडून हरकती मागविण्यात येतात. मात्र पाचोरा शहरातील जागांच्या उठविण्यात आलेल्या आरक्षणाबाबत या नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे. Live Trends News यामध्ये ऑनलाईन सभेत कोणतीही चर्चा न करता हे विषय तातडीने मंजूर करण्यात आलेत. तर कोविडच्या काळात कुणीही वर्तमानपत्रे वाचत नसतांना त्यांनी अगदी स्थानिक पातळीवरील फारशी वाचकसंख्या नसणार्‍या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन यावर हरकती मागविल्या. यानंतर कुणाचीही हरकत आली नसल्याचे नमूद करत याचे प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आले असून याला मंजुरी मिळण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झालेली आहे. या सर्व जागांची कमर्शियल व्हॅल्यू ही तब्बल २१० कोटी रूपयांची असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.

शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे पुढे म्हणाल्या की, ईडीसारख्या यंत्रणा हा फक्त विरोधी पक्षालाच टार्गेट करतात. मात्र पाचोरा नगरपालिकेत जे काही घडलेय ते स्थानिक सत्ताधारी आणि नगरविकास मंत्र्यांना हाताशी धरून करण्यात आल्याची बाब स्पष्ट आहे. Live Trends News या संदर्भात सखोल चौकशी करण्याची गरज आहे. पाचोरा नगरपालिकेप्रमाणेच इतर नगरपालिकांमध्येही याच प्रकारचे घोटाळे यातून उघडकीस येण्याची शक्यता असल्याचा आरोप सुषमाताईंनी केला. या संदर्भात, आपण न्यायालयात दाद मागणार असून सोबतच ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील सुषमाताई अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

Protected Content