पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या रॅक मधुन रेल्वे रुळ उतरवितांना वायर लुम तुटल्याने ५ रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६५ / २१ / २३ नजीक आज रोजी सकाळी रेल्वे रॅकवॅगनमधुन रेल्वे रुळ उतरविण्याच्या कामास सुरुवात झाली. दरम्यान सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे रुळाला वायर लुमच्या साहाय्याने बांधण्यात येवुन धिम्या गतीने रुळ खाली घेत असतांनाच रेल्वे रुळ बांधलेला वायर लुम अचानक तुटला.
अकस्मात लूम तुटल्याने त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले नगरदेवळा हेडक्वार्टरचे कर्मचारी सुरेश कुमार (वय – २८) रा. पश्चिम बंगाल, राजु कुमार (वय – २४) रा. बिहार, रवि कुमार (वय – २४ रा. बिहार), चेतन पाटील (वय – ३२) व रविंद्र पाटील (वय – ५७) हे जखमी झाले. घटना घडताच सुपरवायझर यांनी रुग्णवाहिकेस पाचारण केले असता येथील रुग्णवाहिका चालक भागवत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व पाच ही जखमींच्या हातावर भार आल्याने यातील तीन जणांना जनरल वार्डात तर उर्वरित दोन जणांना आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी हा अपघात झाला कसा ? याबाबत रेल्वे प्रशासन तपास करीत आहेत.
घटनास्थळाचे सुपरवायझर यांची माहिती देण्यास टाळाटाळ
दरम्यान, पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळ उतरवितांना वायर लुम तुटल्याने ५ कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी नंदू शेलकर हे रुग्णालयात घटनेची माहिती घेण्यासाठी गेले असता सदर कामावरील सुपरवायझर यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. आपण डिव्हीजन ऑफिसला घटनेबाबत कळविले असुन तुम्ही तेथे जावुन माहिती घ्या. असे सांगत त्यांनी माहिती देण्यात नकार दिला.