गोवंश तस्करी करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात : एकाविरूध्द गुन्हा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कत्तलीसाठी गुरांची तस्करी करणारे वाहन आज पोलिसांनी पकडले असून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, गोवंश हत्येसाठी तारखेडा रोडवरुन एका चारचाकी (छोटा हत्ती) वाहनातुन बैल घेवुन जात असल्याची गुप्त माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पो. कॉं. योगेश पाटील, राहुल बेहरे या पथकाने वृंदावन हॉस्पिटलसमोरुन जात असलेल्या छोटा हत्ती क्रं. एम. एच. १९ बी. एम. ५६१६ या वाहनास अडवुन चौकशी केली असता त्यात एक पांढर्‍या रंगाचा खिल्लारी बैल आढळुन आला.

या प्रकरणी चालकास विचारपूस केली असता त्याचे कडुन समर्पक उत्तरे न मिळाल्याने वाहन ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणण्यात आले. चौकशी अंती ३० हजार रुपये किंमतीचा खिल्लारी बैल हा गोवंश हत्येसाठी घेवुन जात असल्याचे निष्पन्न झाले. घटनेप्रकरणी अरबाज सलिम कुरेशी (रा. नगरदेवळा ता. पाचोरा ) याच्या विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.

Protected Content