पाचोरा प्रतिनिधी | सध्या व्यापार्यांच्या मनमानीमुळे केळीचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकर्यांनी आमदार किशोर पाटील यांनी या प्रकरणी शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्याला दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, केळी उत्पादनासाठी शेतकर्याला मोठा पैसा खर्च करावा लागतो. मात्र व्यापारी रावेर येथील रेट बोर्ड प्रमाणे भाव न देता मनमानी भावाने केळी खरेदी करून लूट करत असल्याने शेतकरी त्रस्त आले आहेत. त्यामुळे पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाच्या माध्यमातून साकडे घातले. व्यापारी बोर्ड रेटप्रमाणे केळी खरेदी करत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणीही दिलेल्या निवेदनात केली.
या निवेदनात म्हटले आहे की, केळीचे उत्पादन येईपर्यंत शेतकर्यास प्रति झाड ५० ते ६० रुपये खर्च येतो. मात्र परिसरातील व्यापारी केवळ ३०० ते ३५० रुपये क्विंटल दराने केळी खरेदी करतात. परिणामी वर्ष ते सव्वा वर्ष राबून शेतकर्याच्या हातात प्रति झाडामागे केवळ २ ते ३ रुपये शिल्लक राहतात. रेट बोर्ड नुसार केळी खरेदी सक्तीची करा, त्यानुसार भाव न दिल्यास संबंधित व्यापार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रावेर येथे केळीचे रेट बोर्ड १००० रुपये असून प्रत्यक्षात व्यापारी ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने केळी खरेदी करतात. त्यामुळे रावेरच्या व्यापार्यांना ज्यादा भाव देऊन केळी खरेदी करणे परवडते तर येथील व्यापारी केळी उत्पादक शेतकर्यांवर का अन्याय करतात, असा प्रश्नही शेतकर्यांनी उपस्थित केला.
या वेळी सोमनाथ पाटील, स्वरूप राजपूत, विनोद राऊत, दशरथ वाडेकर व आदीकराव वाडेकर, योगेश महाजन, चेतन मराठे, ज्ञानेश्वर पाटील, कन्हैया जयसिंग, मयूर मणियार, जयसिंग राजपूत, प्रवीण राजपूत, कोमल पाटील, चंद्रसिंग पाटील, संदीप बनकर, शंकर पवार, दादासाहेब सपकाळ, विनोद माने, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, किशोर महाजन, आशिष महाजन, सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी व्यापार्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही.