अट्टल चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

भुसावळ प्रतिनिधी | विवाहात वर्‍हाडी बनून हात साफ करणार्‍या चोरट्यास बाजारपेठ पोलिस स्थानकाच्या पथकाने अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, २८ नोव्हेंबरला रोजी बालाजी लॉन येथे झालेल्या विवाह समारंभात विनायक शिवाजी दराडे (वय ३०, रा. साईकिरण अपार्टमेंट, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण) यांच्या पत्नीची पर्स खोली क्र. पाचमधून लांबवण्यात आली होती. या पर्समध्ये १ लाख १० हजार ७५४ रुपयांचे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजारांची रोकड होती. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

या तपासात राहुल वासुदेव भामरे (वय ३७, रा. साईनगर, जळगाव) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भामरे याने या गुन्ह्याची कबुली दिली. राहुल भामरे याने चोरलेले दागिने जळगावमध्ये विकल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याने सांगितल्यावरून पोलिस पथकाने एक लाख १४ हजार ४४६ रुपयांचे दागिने जप्त केले. दरम्यान, भामरे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content