पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील निलम कट्टा भागात एकावर प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या तीन आरोपींना पकडण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींकडून लोखंडी चॉपरसह गावठी बनावटीचे दोन पिस्टल (कट्टे) व ७ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
या संदर्भात अधिक असे की, दि ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रोड, निलम कट्टा भागात रोडवर विशाल राजेंद्र पाटील (वय. २२, धंदा-मजुरी, रा. शिवाजी नगर, पाचोरा) यांना चंद्रकांत सुर्यकांत नाईक, अविनाश सुर्यकांत नाईक व निलेश अनिल सोनवणे (सर्व रा. पाचोरा जि. जळगाव) यांनी विशालला लोखंडी चॉपरने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून तिघंही जण फरार होते. या संदर्भात पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २९९/२०१९ भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे पोलीस उपनिरीक्ष युवराज रबडे यांनी गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस उप निरीक्षक गणेश चोभे, पोलीस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे, विनोद पाटील, दिपक सुरवाडे, नंदकुमार जगताप, विश्वास देशमुख, पोलीस शिपाई किरण पाटील, किशोर पाटील, विनोद बेलदार, स.फौ. चालक दामोदर सोनार यांच्या पथकाने शिताफीने तपास करुन गुन्हयातील आरोपी क्रमांक १ ते ३ यांचा शोध घेवुन त्यांना अटक केली आहे. तसेच आरोपींकडुन गुन्हयात वापरलेले हत्यार लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, आरोपींकडुन गावठी बनावटीचे दोन पिस्टल (कट्टे) व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपी हे सराईत असून त्यांच्याविरुध्द यापुर्वी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखालील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.