जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजवर अनेकांचे बळी घेतलेल्या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुन्हा एक जण अपघातात ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
या संदर्भातील माहिती अशी की, आशाबाबा नगरातील विजय नामदेव भोई ( वय 50 ) यांची शिव कॉलनी स्टॉपजवळ पानटपरी आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉपजवळ महामार्गावर येत असतांना गुजराल पेट्रोल पंपाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या एमएम09 एजी 1138 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडले. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने सुमारे 60 फुटापर्यंत त्यांना फरफटत नेले. यात विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.