जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ७ जुलै रोजी धुळे व १६ जुलै रोजी जळगाव येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशक आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या विभागाच्या वतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबीर आदींचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकाकीपण, निराशा, स्मृतीभ्रंश,शारीरिक समस्या अशा अनेक बाबी वाढीला लागल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहाय्याने परिसरातील गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी समुपदेशक आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत सत्कार्योत्तेजक सभेचे भारतीय विद्या संशोधन केंद्र, मालेगाव रोड, धुळे येथे आणि १६ जुलै रोजी श्री.चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्य नगर, गणेश कॉलनी, जळगाव येथे सकाळी १० ते ४ या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. धुळे येथे डॉ.गोकुळ चौधरी, प्रा.व्ही.व्ही.निफाडकर आणि जळगाव येथे डॉ.जे.एन.चौबे, डॉ.विना महाजन हे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. धुळे येथे समुपदेशनासाठी गौरव वाणी (भ्रमणध्वनी क्र.९६२३१ ४३७१४), जळगावसाठी महेश जडे (भ्रमणध्वनी क्र.९८२२५ २६२९६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी केले आहे.