जेसीएलमध्ये खान्देश ब्लास्टर्स व कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विजयी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी२०चे सामने अधिक रंगतदार होत आहे. दुसर्‍या दिवशीच्या दोन सामन्यांमध्ये खान्देश ब्लास्टर्स व मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हे संघ विजयी झाले.

जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण अठरा सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी रात्री उशिरा संपन्न झालेल्या तिसर्‍या सामन्यामध्ये खान्देश ब्लास्टर्स संघाने मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाचा पराभव केला. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकात ११५ धावा केल्या. खान्देश ब्लास्टर्स संघाने ७ गडी गमावून ११६ धावा करीत हा सामना जिंकला. सर्वाधिक धावा करणारा वकार शेख हा सामनावीराचा मानकरी ठरला. पहिला सामना खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध स्पेक्ट्रम चॅलेंजर्स यांच्या खेळविला गेला. हा सामना खान्देश ब्लास्टर्स संघाने जिंकला. स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत ८ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या. रिझवान पठानने ताबडतोब फलंदाजी करीत १५ चेंडूंमध्ये ४ षटकार व २ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. खान्देश ब्लास्टर कडून कुणाल पाठक व नचिकेत ठाकुर यांनी प्रत्येक २ गडी बाद केले. तसेच वकार शेख व धवल हेमनानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. खान्देश ब्लास्टर तर्फे तौसिफ मिर्झाने ३८ चेंडूंमध्ये ६ चौकार व ४ षटकाराच्या मदतीने ६५ धावा केल्या. शितल कोतुलने ४४ धावांचे (४ चौकार व १ षटकार) योगदान दिले. तौसिफ मिर्झा हा सामनावीराचा मानकरी ठरला.
दुसरा सामना मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात झाला. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९ षटकांमध्ये सर्व बाद फक्त ९९ धावा केल्या. सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स तर्फे शिव पुरोहित याने ४ षटकात फक्त ८ धावा देत ४ बळी टिपले. तसेच सुरज मैत्यनेही ४ षटकात २२ धावा देत ४ बळी टिपले. प्रत्युत्तरात १०० धावांचे माफक लक्ष घेऊन खेळतांना सिल्व्हल ड्रॉप हेल्दी मास्टर्सचा संघ १८.१ षटकांमध्ये सर्वबाद फक्त ९१ धावाच करु शकला. त्यात विजय लोहारने २२ तर मोहित चौधरीने २१ धावांचे योगदान दिले. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघातर्फे ओम मुंडेने ४ षटकात २५ धावा देत ४ बळी घेतले. तसेच जावेद शेख याने २ बळी घेतले. ओम मुंडे हा सामनावीराचा मानकरी ठरला.

दरम्यान, जेसीएलच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलमध्ये जोश भरण्यासाठी व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दररोज सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये आज शहरातील अनुभूति स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या प्रदर्शनाने रंगत आणून खेळाडूंमध्ये जोश भरण्याचे काम केले. कार्यक्रमाची सुरुवात दंडासेला या नृत्याने झाली. त्याचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. त्यानंतर स्वराज्याची महती सांगणारा पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केला.

दि. १४ मार्च २०१९ रोजी ही जेसीएल टी २० मध्ये तीन सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना सकाळी ९ वाजता स्पेक्ट्रम चॅलेंजर्स विरुद्ध मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. दुसरा सामना दुपारी ३ वाजता खान्देश ब्लास्टर्स विरुद्द सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. तिसरा सामना सायंकाळी ७.१५ वाजता एम.के. वॉरियर्स विरुद्ध रायसोनी अचिव्हर्स यांच्यात रंगणार आहे.

जिल्ह्यातील क्रिकेटला चालना देणे हा जेसीएलचा मुख्य उद्देश आहे. खेळाडूंना आपल्याच शहरात संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी उत्तम क्रिकेट बघण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएल बघायला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content