अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलाकार, विद्यार्थी नेते, युवांशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतील.
यात युवांसाठी कथांचे अभिवाचन , नाटक, एकांकिकासह परिसंवाद, गट चर्चा, काव्य व गझल संमेलन, युवा रॅप सिंगर चे रॅप गीते, शैक्षणिक धोरणावर चर्चा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून विविध विद्यापीठांमध्ये लढलेले विद्यार्थी कार्यकर्ते व लोकशाहीवादी कार्यकर्ते यांचा गौरव विद्रोहीच्या मंचावर करण्यात येणार आहे.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘आसक्त’ प्रस्तुत ‘ मंटो कि बदनाम कहानियॉं ’ मंटोच्या निवडक कथांचे अभिवाचन होणार असून मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजळ यांनी केला असून सुयोग देशपांडे यांचे दिग्दर्शन असून यात तृप्ती देवरे, मुक्ता कदम, अतुल जैन हे कलाकार असतील.
विद्रोहाच्या मुख्य मंचावर सुप्रसिद्ध आत्मवृत्त ‘भुरा’चे युवा लेखक व तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांच्याशी साहित्य संवाद साधला जाणार आहे. ‘गोष्ट पैशापाण्याची’ या बेस्ट सेलर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला असून यात सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक ‘चेकमेट’ कार सुधीर सूर्यवंशी हे संयोजन करतील तर प्रसिद्ध युट्यूबर नितेश कराळे उर्फ कराळे गुरुजी हे या सत्राची अध्यक्षता करणार आहे.
युवा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कष्टकरी बहुजन विद्यार्थ्यांसाठी नो एज्युकेशन पॉलिसी या विषयावर परिसंवाद होणार असून यात प्रमुख वक्ते छात्रभारती चे रोहित ढाले , ए एस एफ आय चे विराज देवांग , न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशनच्या निहारिका , एसएफआयचे सोमनाथ निर्मळ, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशिकांत कांबळे , विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे तुकाराम शिंदे हे असतील तर अध्यक्ष प्रा. सुनील वाघमारे असतील. सुप्रसिद्ध युवा रॅप गायिका माही जी, ‘बोल इन्कलाबी’ रॅप गीतकार सागर चांदणे यांचे रॅप कलाप्रकारातील गीत सादरीकरण लक्षवेधी ठरणार आहे.
याप्रसंगी वेगवेगळ्या विद्यापीठात जातीयवादी दडपशाही विरोधात आंदोलन करणारे प्रसंगी मारहाण झेलणारे कधी उलट प्रतिकार करत लढणारे पुणे, मुंबई,वर्धा,संभाजीनगर येथील विद्यार्थी नेते एन एस वाय एफ च्या श्रावणी बुवा, एस एफ आय चे सोमनाथ निर्मळ, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जयेश पाठाडे, अमीर काझी मुंबई,चंदन सरोज,वर्धा, विराज देवांग यांचा गौरव विद्रोहाच्या मुख्य मंचावर करण्यात येणार आहे.