दुचाकी आयशरवर आदळल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते धरणगाव रस्त्यावरील आश्रम शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील काकरदे येथील अरविंद रामदास माळी (वय-२८) आणि गणेश सुपडू अहिरे हे दोघेजण २७ मार्च रोजी सकाळी दुचाकी (एमएच ३९ एजी ९६४) ने अमळनेर मार्गे धरणगाव येथे जाण्यासाठी निघाले. सकाळी ११ वाजता अमळनेर ते धरणगाव रोडवरील माजी आमदार बी.एस. पाटील यांच्या आश्रम शाळेजवळून दुचाकीने दोघे जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात आयशर वाहनाने ओव्हरटेक करून पुढे जाऊन अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणारे अरविंद माळी आणि गणेश अहिरे हे दुचाकीसह आयशरवर आदळले. या अपघातात अरविंद रामदास माळी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला गणेश सुपडू अहिरे हा गंभीर दुखापत जखमी झाला. अपघात घडल्यानंतर आयशर गाडी चालक हा वाहन घेऊन पसार झाला होता. या संदर्भात मयताचे नातेवाईक अविनाश जीभाऊ वाघ यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर गाडीवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

Protected Content