जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावांत ३० सप्टेंबर पासुन आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धा ४ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.


महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या अधिपत्याखाली दरवर्षी पाच राज्य स्पर्धा घेण्यात येतात, त्यापैकी ही ह्या वर्षाची ही चौथी स्पर्धा आहे. विविध सात गटात मुले आणि मुली ह्यांच्यात सामने होतील. मिडजेट,कॅडेट,सब ज्युनियर,ज्युनियर, युथ,पुरुष व महिला अशा विविध गटात राज्यातील एकूण जवळपास आठशे मुलं, मुली, पुरुष, महिला खेळाडू सहभागी होतील.
सर्व गटातील विजयी,उपविजयी तसेच उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत पात्र खेळाडूंना राज्य असोसिएशनने दिलेल्या तक्त्यानुसार रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.याचबरोबर राज्य असोसिएशनच्या नियम व अटीनुसार सामने खेळविण्यात येतील. खेळाडूंनी दि. २५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन पध्दतीने राज्य असोसिएशनच्या mstta@gmail.com वर प्रवेश नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेला आमदार राजुमामा भोळे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर ह्यांचे सहकार्य लाभत आहे.
स्पर्धा आयोजना संदर्भात जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सल्लागार प्रा. चारुदत्त गोखले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, खजिनदार संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव राजु खेडकर, क्रीडा संघटक नितीन बर्डे, रवींद्र धर्माधिकारी, ऍड. विक्रम केसकर, अमित चौधरी,भरत मतानी,अमित शर्मा आदी उपस्थित होते.


