मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारचा अध्यादेश

मुंबई प्रतिनिधी । वैद्यकशास्त्राच्या प्रवेशासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आज अध्यादेश काढल्यामुळे या समस्येवर तोडगा निघाला आहे.

पदव्युत्तर वैद्यकीयसाठी प्रवेशपरीक्षा आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर मराठा आरक्षण कायदा लागू झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रवेशांसाठी आरक्षण लागू होऊ शकत नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. अध्यादेश आता स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाईल आणि त्यांनी स्वाक्षरी केल्यावर अध्यादेश लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले की, १९५ विद्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर आणि ३२ विद्यार्थी दंतवैद्यकीय या शाखेतील असून त्यांच्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. १६ टक्के आरक्षण लागू केल्याने प्रवेश मिळू न शकलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खासगी वैद्कीय महाविद्यालयात किंवा अभिमत विद्यापीठात प्रवेश घेतल्यास त्यासाठी राज्य सरकारकडून मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत मुदत दिली असून ती ३० मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सरकारने न्यायालयात केला असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

Add Comment

Protected Content