ऑनलाइन सेवा पुरवण्यात टेलिकॉमची भूमिका निर्णायक : डॉ. सिंह

72316183 5eb5 433f a2f1 f5dad987477d

भुसावळ (प्रतिनिधी) टेलिकॉममुळे गेल्या दोन वर्षांत रेल्वेची तिकिटे, जन्म प्रमाणपत्रे, तक्रारी ऑनलाइन नोंदणे, ऑनलाइन बँकिंग सेवा, विविध उपयोगितांसाठी बिले अदा करणे इ. बहुतेक सेवा मोबाइल फोनवर येत आहेत. कारण टेलिकॉम क्षेत्राची घोडदौड जोमाने सुरू आहे. शेतीपासून उत्पादन क्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून सरकारी यंत्रणेपर्यंत सर्वच क्षेत्रांत टेलिकॉम निर्णायक भूमिका बजावत आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह यांनी आज (१७ मे) जागतिक दूरसंचार दिनानिमित्त श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागात आयोजित तज्ञ प्राध्यापकांच्या बैठकीत दिली.

 

 

५ जी तंत्रज्ञान व आर्टिफिशयल इंटिलीजन्सवर प्राध्यापकांची कार्यशाळा होणार आहे. ५ जी तंत्रज्ञानात वापरली जाणारी अत्याधुनिक साधन सामुग्री व त्यांचा वापर यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापकांना शिकवला जाणार आहे. प्राचार्य सिंह पुढे म्हणाले की, भारताची मोठी लोकसंख्या आणि स्मार्टफोनचा वाढत असलेला प्रभाव यामुळे भारतातील टेलिकॉम बाजारपेठ ही या क्षेत्रासाठी जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आपल्याजवळ असलेला फोन हा केवळ संपर्क करण्याकरिता नव्हे तर माहितीचे एक मोठे साधन म्हणून समोर आलेले आहे. यापुढे जाऊन अनेक उद्योगांच्या सेवा स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम क्षेत्रात पुढील दोन वर्षात २० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे अहवाल विविध संस्थांनी दिले आहेत. टेलिकॉमचा प्रभाव हा असाच वाढत जाणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना या क्षेत्रात रोजगारक्षम बनवण्याची तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव बिग डेटा, मशिन लर्निंग, कम्प्युटिंग पॉवर, स्टोअरेज कपॅसिटी, क्लाउड कम्प्युटिंग यामुळे लक्षणीय वाढला असून, आरोग्यसेवा, शिक्षण, अर्थ उद्योग, शेती आणि दळणवळण या क्षेत्रांना याचा मोठा लाभ होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारताची वाटचाल सुरु झाली असून, चीन व अमेरिकेशी बरोबरी करणे आपणास आव्हानात्मक ठरणारे आहे. मात्र, पीक व्यवस्थापन, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांवर याचा मोठा व सकारात्मक प्रभाव पडेल. यासाठी गुणवत्तापूर्ण डेटा, कुशल मनुष्यबळ व योग्य तंत्रज्ञान याची गरज लागेल आणि हे खूप कमी वेळात आपल्याला करणे गरजेचे आहे. म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेबाबत पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे, असे मत डॉ. गिरीष कुळकर्णी यांनी यावेळी मांडले. प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा. दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील व नितीन पांगळे आदी या बैठकीला उपस्थित होते.

Add Comment

Protected Content