श्री कालीका पतसंस्थेतील आर्थिक अपहारप्रकरणी कार्यवाहीचे आदेश

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था लि. ही संस्था सध्या अवसायनात असतानाही तिचे चेअरमन पंकज सोनार यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांच्या वतीने करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याचे सहकारी संस्था उपनिबंधक मिलींद साबळ यांनी संस्थेचे चेअरमन तसेच संबंधित सहकार अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारीनुसार, संस्थेने कर्जदारांकडून सुमारे ८० टक्के रक्कम वसूल करूनही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत न करता सदर रक्कम अन्यत्र वापरली गेली. तसेच शासन अनुदानातही अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पतसंस्थेच्या चेअरमन पंकज सोनार व अवसायक दस्तगीर तडवी यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या कलम ९८ अंतर्गत जिल्हा उपनिबंधकांनी पूर्वीच दोष निश्चित केले होते, त्याच्या अनुषंगाने देखील चेअरमन सोनार यांनी मालमत्तेवरील बोजा कमी करून हस्तांतरण केले व आर्थिक नुकसान घडवले आहे. यामध्ये त्यांना सहकार अधिकारी एस.एफ. गायकवाड आणि दस्तगीर तडवी यांची मदत लाभल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, उपनिबंधक मिलींद साबळ यांनी सदर तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे व निलंबनाची कार्यवाही करण्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
आता प्रत्यक्षात गुन्हा नोंदवून दोषींवर कधी आणि कशी कार्यवाही केली जाणार, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Protected Content