रावेर परिसरात अवैध दारू विक्रीचा उच्छाद; गृहिणींची कारवाईची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये गल्लीबोळात सर्रासपणे हातभट्टीची अवैध दारू विक्री होत असून, या प्रकारामुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गृहिणींनी व समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

या अवैध दारू विक्रीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांच्याकडून या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याची जोरदार चर्चा असून, त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यापूर्वी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीती पसरली असून, काहींनी विक्री थांबवली आहे. मात्र, हा प्रश्न केवळ प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपामुळे मावळणारा नसून, अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच महामार्गालगत असलेल्या ठिकाणी विनापरवाना दारू विक्री सर्रास सुरू असून, काही ठिकाणी या व्यापाराला स्थानिक अधिकाऱ्यांचे “संरक्षण” असल्याचे आरोप काही व्यापाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले आहेत.

या संदर्भात पत्रकारांनी निरीक्षक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून कारवाईबाबत विचारणा केली असता, त्यांनी “मी काही माहिती देणार नाही. ती जळगाव कार्यालयातून घ्या,” असे उत्तर दिले. या उत्तरामुळे त्यांच्या भूमिकेवर आणि विभागाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रकरणात उत्पादन शुल्क विभाग काय पावले उचलतो, याकडे आता संपूर्ण रावेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content