Home प्रशासन तहसील फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ; चौकशीची मागणी

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ; चौकशीची मागणी

0
18

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात सुरू असलेल्या विविध नागरी विकासकामांच्या गुणवत्ता, कामाची पद्धत आणि खर्चाबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा (टायगर) राजेंद्र चौधरी यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादवून संबंधित कामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीअंती अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, फैजपूर शहरात नभो गार्डन, जलतरण तलाव, गटारी, रस्ते तसेच अन्य नागरी विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य, कामाचे प्रमाण, मंजूर अंदाजपत्रकानुसार कामाची अंमलबजावणी तसेच बिल आणि मोजमाप पुस्तिकेतील नोंदी याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक तसेच प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी करताना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मंजूर अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, प्रत्यक्ष वापरण्यात आलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित देयकांची सखोल तपासणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विकासकामांच्या तपासणीदरम्यान अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, मंजूर अंदाजपत्रकापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे काम, चुकीच्या अथवा बोगस नोंदी किंवा शासनाच्या निधीचा गैरवापर आढळून आल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळणाऱ्या कामांबाबत आवश्यकतेनुसार तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांना अशा कामांना पुढे सुरू ठेवण्यास प्रतिबंध करावा आणि चौकशीत दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करून शासनाच्या निधीचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे, असे निवेदनात म्हटले आहे. शहरातील विकासकामांवर सार्वजनिक निधी खर्च होत असल्याने कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि मंजूर निकषांनुसार अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनातून अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारास देण्यात यावी, अशी विनंती कृष्णा (टायगर) राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे. निवेदन साद करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा (टायगर) चौधरी, उपशहराध्यक्ष नदीम तडवी, उपशहराध्यक्ष वेदांत कुलकर्णी, उपशहराध्यक्ष दानिश भाई, शहर संघटक पवन परदेशी यांच्यासह पंकज मिस्त्री, भूषण मिस्त्री, दीपक वाघोदे, बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound