यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ५६.०३ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. शेळगाव बॅरेजजवळ तापी नदीकाठी या योजनेचा उद्भव घेण्यात आला असून जॅकवेल, इंटेक वेल, जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरातील वितरण वाहिनीचे काम वेगाने सुरू आहे. आगामी फेब्रुवारी-मार्चपर्यंत या नवीन योजनेतून यावल शहराला पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिली.
या योजनेला १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून कामासाठी मे. एस.सी.आय.पी.एल. व संदीप कन्स्ट्रक्शन, गंगाखेड या कंत्राटदारांना २३ मे २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. सध्या योजनेचे विविध घटक युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. योजनेचा पाणीउद्भव तापी नदीकाठी शेळगाव बॅरेज येथे टाकरखेडा गावाजवळ घेण्यात आला आहे. या ठिकाणी पाच मीटर व्यासाचे इंटेक वेल, दोन इन्स्पेक्शन वेल आणि आठ मीटर व्यासाचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. तसेच २०० मीटर लांबीचे अप्रोच बंड आणि ६०० मीटरचा अप्रोच रोड प्रस्तावित आहे. नदीतील पाणी इंटेक वेलच्या माध्यमातून जॅकवेलमध्ये आणण्यासाठी ६०० मि.मी. व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. अप्रोच बंडचे काम पूर्ण झाले असून जॅकवेल व इंटेक वेलचे काम वेगाने सुरू आहे. जॅकवेलमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी २५० एचपी क्षमतेचा पंप बसवण्यात येणार आहे. तसेच विजेवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने १९० केव्ही क्षमतेचा सोलर प्लांट उभारण्यात येत आहे. जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यानच्या ४०० मि.मी. व्यासाच्या एकूण आठ किलोमीटर पाइपलाइनपैकी ४.१० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

योजनेअंतर्गत दररोज ११ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात प्री-सेटलिंग टँक, बॅकवॉशिंग मेकॅनिझम तसेच कॉम्प्रेस्ड एअरच्या माध्यमातून फिल्टर बेड स्वच्छ करण्याची आधुनिक व्यवस्था असणार आहे. Recirculation Sump च्या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार असून Pure Water Sump मधून पाणी पुढे पाठवले जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून ६० एचपी पंपाद्वारे २२ लाख लिटर क्षमतेच्या साने गुरुजी जलकुंभात, तर ५० एचपी पंपाद्वारे १० लाख लिटर क्षमतेच्या श्रीराम नगर जलकुंभात पाणी पाठवण्यात येणार आहे. केंद्रावर १२० केव्ही क्षमतेचा स्वतंत्र सोलर प्लांटही प्रस्तावित आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून शहरातील एकूण ५७ किलोमीटर वितरण वाहिनीपैकी २१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांनी सांगितले की, प्रशासनाच्या माध्यमातून योजनेचे काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योजनेच्या कामात रस्त्याशी संबंधित काही अडचण निर्माण झाली होती. तीदेखील लवकरच सोडवून कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील यांनी पाहणीनंतर समाधान व्यक्त केले. २०२१ मध्ये यावल शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून दरडोई १३५ लिटर पाणी उपलब्ध झाले पाहिजे, या संकल्पनेतून या योजनेचे स्वप्न पाहण्यात आले होते. आता या योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून जॅकवेलपासून फिल्टरपर्यंत ४०० मि.मी. आणि ६०० मि.मी. डीआय पाइपलाइनचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेसाठी ५६ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर असला तरी आतापर्यंत केवळ सुमारे साडेसात कोटी रुपये निधी प्राप्त झाला असल्याचे अतुलभाऊ पाटील यांनी सांगितले. निधीची मर्यादा असतानाही ठेकेदाराने स्वतःच्या पदरमोडीतून काम सुरू ठेवून आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण केले आहे, असा दावा त्यांनी केला. जुन्या पारंपरिक जलशुद्धीकरण पद्धतीत गाळ मॅन्युअली काढावा लागत होता; मात्र नवीन केंद्रात आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून गाळ काढण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने काम अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२०२१ मध्ये पाहिलेले पाणीपुरवठा योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत असून, कामाला अपेक्षित गती मिळाल्यास फेब्रुवारी-मार्चपर्यंत शेळगाव योजनेतून यावल शहराला पाणीपुरवठा सुरू करता येईल, असा विश्वास अतुलभाऊ पाटील यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांच्या पाहणीवेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, दादू धोत्रे, पीएमसीचे जैन व सुमित यांच्यासह नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, उमर शेठ कच्ची, करीम मन्यार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश शेठ कवडीवाले, संतोष धोबी, योगेश पाटील, पप्पूदादा जोशी, फारूक हाजी, नरेंद्र शिंदे, भूषण खैरे, किशोर माळी तसेच पत्रकार उपस्थित होते.



