नाशिक लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । “जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनी केला होता. या आरोपांवर पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाचे आमदार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “अपूर्ण माहितीवर कोणी बोलत असेल, तर ती गोष्ट खोटी आहे. जळगावमध्ये काल जी घटना घडली, ती गाईच्या भांडणावरून घडली आहे. त्या घटनेत ज्या मुलीला गाडीत टाकले गेले, ती रुग्णवाहिका शिवसेनेची होती. त्यामुळे आम्हाला घटनेची माहिती मिळाली. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय, कलम न पाहता, पोलिसांचे म्हणणे न ऐकता आणि साक्षीदारांना न विचारता मुलींच्या बाबतीत आरोप करणे आणि जळगावची वाट लागली आहे, असे म्हणणे योग्य नाही,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
“जळगावमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत, असे एकनाथराव खडसे म्हणाले. पण ही घटना घडली, तेव्हा मी अर्ध्या तासात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. ही घटना माझ्याच मतदारसंघातली आहे. विरोधी पक्षाचे आमदार जळगावला बदनाम करण्याचे षड्यंत्र करत आहेत. मलाही मुलगी आहे. त्यामुळे मुलींच्या बाबतीत आरोप करताना काळजी घ्यावी,” असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे जळगावमधील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथराव खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.